बुधवार, २६ नोव्हेंबर, २०१४

विशेष मुलाखत - डॉ.विद्या अत्रेया

रेडीओ-कॉलरचा सिग्नल चेक करतांना विद्या अत्रेया आणि सहकारी 
डॉ. विद्या अत्रेय या पुणेस्थित एक प्रसिद्ध वन्यजीव-अभ्यासक आहेत. सध्या त्या वाईल्डलाईफ कन्झर्वेशन सोसायटी, बेंगालुरू येथे वाईल्डलाईफ बायोलॉजीस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय ‘मानव-बिबट्या यांच्यातील आंतरक्रिया’ हा आहे. या विषयावर त्यांनी पीएच.डी केली आहे. बिबट्यांची जीवनशैली, त्यांचा स्वभाव, आपल्या निवासस्थानाबद्दलची त्यांची ओढ अशा अनेक गोष्टींचा त्या वर्षानुवर्षे अभ्यास करत आहेत. मानव-बिबट्या संघर्षाची कारणे शोधून तो शमविण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून त्या प्रयत्नरत आहेत. एखादी समस्या सोडवितांना सर्वांना सोबत घेऊन ती सोडविण्यावर त्यांचा नेहमी भर राहिला आहे. त्यांच्या या मोलाच्या कार्यासाठी त्यांना अनेक मानसन्मानांनी गौरविण्यात आले आहे. बिबट्या-मानव संघर्षावर तोडगा काढण्यासाठी नियमावली बनवतांना केंद्र सरकारलाही त्यांच्या संशोधनाची मोठी मदत झाली आहे. त्यांचे काम आणि त्याचे महत्त्व समजून घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न
सरळधोपट नौकरी-व्यवसायाचा मार्ग सोडून तुम्ही वन्यजीवांच्या अभ्यासाकडे कशा काय वळलात?
प्राण्यांबद्दल मला नेहमीच जिव्हाळा होता. पण पहिल्यांदा जेव्हा मी एका जंगलात, तामिळनाडूतील अन्नामलाई जंगलात, गेले तेव्हा मला जाणवले कि हे खरोखर असे काहीतरी आहे कि ज्याची मला खूप आवड आहे.
अभ्यासासाठी इतर कोणताच प्राणी न निवडता तुम्ही बिबट्याचीच निवड का केली? वाघाभोवती तर फार मोठे प्रसिद्धीचे वलयही आहे.
माझ्या अभ्यासाचा मुख्य विषय म्हणून मी बिबट्याची निवड केली नाही. मी संघर्षाची निवड केली जो चित्ताकर्षक आहे कारण त्यात फक्त प्रण्यांचाच अभ्यास नाहीये तर माणसांचा आणि माणूस आणि वन्यजीव यांच्या परस्परक्रियांचाही अभ्यास आहे. याला सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक पैलू आहेत जे या अभ्यासाला खरोखरच मनोरंजक बनवतात.
बिबट्याने मारलेल्या शेळीसोबत तिचा मालक - फोटो- विद्या अत्रेया
बिबट्या हा हिंस्र प्राणी आहे. त्यावर काम करतांना तुमच्या जीवाला धोका निर्माण झाला असे कधी झाले का?
नाही. तो हिंस्र होतो तेव्हा जेव्हा त्याला डिवचले जाते. जेव्हा आम्ही या प्राण्यांचा अभ्यास करतो तेव्हा त्याला कोणत्याही प्रकारची वाईट वागणूक मिळू नये याची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वोत्तम पद्धतींचा वापर करतो. जेव्हा एखाद्या प्राण्याला रेडीओ-कॉलर लावायची असते तेव्हा तज्ञ पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली त्याला भूल (अनेस्थेशिया) दिली जाते. अशाप्रकारे आम्ही त्या प्राण्याचे आणि आमचेही जीवन धोक्यात घालत नाही.  
तुमच्या संशोधनातून आणि इतिहासातूनही हे सिद्ध होते कि बिबट्यासारखे वन्यप्राणी माणसांच्या आसपास शांततेने राहत आले आहेत तर आताच हा मानव-प्राणी संघर्ष वाढलेला का दिसतो आहे आणि यावर उपाय काय?
मला नक्की नाही सांगता येणार कि खरोखरच संघर्ष वाढलाय कि माध्यमांद्वारे संघर्षाच्या घटनांचे होणारे प्रसिद्धीकरण वाढले आहे. माध्यमे ही मानव आणि वन्यजीव यांच्यातील नकारात्मक परस्परक्रियांना (ज्याला आपण संघर्ष म्हणतो) मोठ्याप्रमाणावर प्रसिद्धी देतात. म्हणूनच आपल्याला असे वाटते कि वन्यप्राणी फक्त संघर्षच निर्माण करतात. तुम्ही जर या वन्यप्राण्यांसोबत काम करणाऱ्या लोकांपैकी कोणालाही विचारले तर ते तुम्हाला सांगतील कि भारतात जास्तीतजास्त ठिकाणी स्थानिक लोकांनी या प्राण्यांच्या ऐतिहासिक अस्तित्वाशी जुळवून घेतले आहे. परंतु शहरी संशोधक आणि मिडिया प्रतिनिधी म्हणून आम्ही जेव्हा कधी ग्रामीण लोकांना प्रश्न विचारतो तेव्हा फक्त संघर्षाबद्दलच विचारतो, मग त्याचेच तेवढे वार्तांकन केले जाते. यावर काही १००% यशस्वी उपाय नसेलही परंतु हा विषय अधिक चांगल्याप्रकारे समजून, अशा परिस्थिती हाताळण्याच्या पारंपारिक पद्धती शिकून आपण वन्यप्राण्यांकडून आपल्याला होणारे नुकसान कमीतकमी करू शकतो आणि हे फक्त स्थानिक लोकांशी चर्चा करूनच करता येईल.        
या विषयात काम करतांनाची सर्वांत संस्मरणीय आठवण आम्हाला सांगाल?
तशा खूप आठवणी आहेत, परंतु त्यातल्या जास्तीतजास्त अकोले संगमनेर येथील स्थानिक वन विभागासोबत काम करतांनाच्या आहेत. एकदा आम्ही एका बिबट्याला पिंजऱ्यात पकडले आणि त्याला रेडीओ-कॉलर लावली. तो वनविभागाच्या नर्सरीत त्या पिंजऱ्यात शांत बसलेला होता. कोणी त्या बिबट्याजवळ जाऊन त्याला त्रास देऊ नये म्हणून तेथे स्थानिक वन विभागाचा एक कर्मचारी थांबला होता. त्याने मला संध्याकाळी ५:०० वाजता फोन केला आणि सांगितले कि जेव्हा तो घरी जाण्यासाठी तेथून निघून बसस्टॉपवर बसची वाट पाहत थांबला होता तेव्हा एक पत्रकार आपल्या मोटारसायकलवरून त्या बिबट्याच्या शोधात नर्सरीकडे गेला. आम्हाला सगळ्यांना टेंशन आले कारण बिबट्याला कोणत्याही प्रकारचा त्रास आम्हला नको होता. म्हणून मी त्या कर्मचाऱ्याला सांगितले कि तू पळत जा आणि तो पत्रकार बिबट्याला काही उपद्रव करणार नाही याची खात्री कर. मी तेथे थोड्यावेळाने पोहचले. तेथे गेटवर काही पहारेकऱ्यांची मुले बसलेली होती त्यांनी मला सांगितले कि त्या पत्रकाराने त्यांना बिबट्या कोठे आहे म्हणून विचारले आणि त्यांनी त्याला सांगितले कि त्याला तर कधीच येथून घेऊन गेले. आणि खास म्हणजे त्यांनी ते अगदी निर्विकार चेहऱ्याने सांगितले. मग आम्ही त्या मुलांना एक किलो जिलेबीची मेजवानी दिली. ज्या मला नेहमी स्मरणात राहतील अशा, ज्यात माणूस आणि बिबटे दोघांचाही समावेश आहे अशा माझ्या आठवणीतील गमतीदार घटनांपैकी ही एक.      
बिबट्याद्वारे मारला गेलेला कुत्रा – फोटो - विद्या अत्रेया
बिबट्याच्या हल्ल्यात कुटुंबातील एखादा सदस्य गमावलेल्या कुटुंबाला तुम्ही कधी भेटला आहात का? त्यांची प्रतिक्रिया कशी होती?
हा या कामाचा सर्वांत दुःखद भाग आहे जो मला आवडत नाही. पण या प्रतिक्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. अशा घटनांचा इतिहास नाही अशा भागात लोक गोंधळलेल्या मनःस्थितीत असतात आणि काही भागांत जेथे मोठ्या प्रमाणावर माणसांवर हल्ले होतात (जसे उत्तराखंड राज्यात) तेथे लोक रागावलेले असतात.  
वन्यप्राण्यांसोबत काम करतांना एखाद्या प्राण्याचा लळा लागला असे कधी झाले का?
नाही. मी या क्षेत्रात एक प्रोफेशनल म्हणून काम करते, मी बिबट्यावर “प्रेम” करते म्हणून नाही. प्रत्येकाची अशी अपेक्षा असते कि मी बिबट्यावर “प्रेम” करावं. मला वाटत तुम्ही ज्या प्रजातीवर काम करत आहात तिच्यात भावनिकरित्या गुंतणे हे कधीकधी तुमच्या संशोधनासाठी नुकसानकारक ठरू शकत कारण मग तुम्ही त्या प्रजातीबद्दल पक्षपाती होऊ शकता. मी जेव्हा बिबट्यासारख्या एखाद्या प्रजातीवर, जी माणसांच्या आसपास राहते, काम करत असते तेव्हा मी बिबट्याला माणसांपेक्षा जास्त महत्त्व देऊ शकत नाही.
मायक्रोचीप, रेडीओ-कॉलर या वस्तूंचा वन्यप्राण्यांना त्रास होत नाही का?
होऊ शकतो पण तेवढाच जेवढा आपल्याला एखाद्या सोन्याच्या साखळीच्या वजनाचा किंवा घ्याव्या लागलेल्या एखाद्या इंजेक्शनचा होतो. परंतु हे अत्यंत गरजेचे आहे कारण वन्यप्राणी हे खूपच बुजरे असतात, विशेषकरून मार्जारवर्गातील मोठे प्राणी. माणसांच्या सहवासात राहणाऱ्या या प्राण्यांबद्दल आपल्याला पुरेशी माहिती असेल तरच आपण त्यांना अधिक चांगल्याप्रकारे हाताळू शकतो. तुम्हाला जर अत्यंत गूढ स्वभावाच्या अशा या प्रजातींचा अभ्यास करायचा असेल तर या पद्धतींचा वापर करणे हाच एकमेव मार्ग आहे. एक संशोधक म्हणून मी मला शक्य असेल तितक्या चांगल्या पद्धतीने या प्राण्यांना वागवण्याचा प्रयत्न करते.  
या क्षेत्रात इतके झोकून देऊन काम करतांना आपले कौटुंबिक, सामाजिक संबंध सांभाळण्यात काही अडचणी आल्या का?
मी स्वतःला पूर्णपणे या कामाला समर्पित केलेले नाही. मला कौटुंबिक आणि सामाजिक संबंध आहेत याचे मला भान आहे. तुम्ही असे म्हणू शकता कि कामाच्या वेळेत मी शक्य असेल तितके अधिक काम करते तितकेच जितके एखादा सामान्य माणूस करेल मात्र त्यापेक्षा जास्त नाही.
बिबट्याच्या पावलांचे उमटलेले ठसे – फोटो - विद्या अत्रेया 
तुमचे असे काही विशिष्ट तत्त्वज्ञान किंवा जीवनाकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी आहे का जिची तुम्हाला तुमच्या या कामात मदत झाली?
सर्वांना समानतेची वागणूक देण्यावर माझा विश्वास आहे. मला वाटत जीवन जगण्याचा हा मुलभूत मार्ग आहे कारण जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा लोकही तुम्हाला चांगली वागणूक देतात.
बिबट्यासारख्या प्रजातींबद्दल सामान्य लोकांच्या प्रतिक्रियांविषयी तुम्हाला त्यांना काय संदेश द्यायला आवडेल?
स्थानिक लोक जे या प्राण्यांच्या सहवासात राहतात त्यांनी रात्रीच्या वेळी आपली गुरेढोरे चांगल्या गोठ्यात ठेवणे हे महत्त्वाचे आहे जेणेकरून त्यांचे नुकसान कमीतकमी होईल. आणखी एक मी असं म्हणेन कि सर्व वन्यप्राणी माणसांना टाळण्याचा अगदी आटोकाट प्रयत्न करतात. जर आपण त्यांच्या त्यांच्या स्पेसचा आदर केला तर तेही आपल्यापासून अंतर राखून राहतील.
-परीक्षित सूर्यवंशी
First published in http://paryavaran.org/
suryavanshipd@gmail.com
@@@

गुरुवार, २८ ऑगस्ट, २०१४

शहरांमधून बेडकांचे नाहीसे होणे...

आनंदा बॅनर्जी, अनुवाद-परीक्षित सूर्यवंशी
जवळपास ३५ कोटी वर्षांपासून बेडकांचे या बुतालावर अस्तित्त्व आहे आणि ते अनेक परीसंस्थांचे अविभाज्य घातक आहेत. फोटो – निर्मल कुलकर्णी 
एखादा कुत्रा शांत पडून राहत असेल, येणाऱ्या-जाणाऱ्याकडे लक्ष देत नसेल आणि भुंकत नसेल तर कोणत्याही संवेदनशील माणसाच्या मनाला ती गोष्ट चटका लावून जाते. न ओरडणाऱ्या बेडूकाचेही त्या भुंकता न येणाऱ्या कुत्र्यासारखेच आहे. या शांततेला अर्थ आहे; विशेषकरून आता, जेव्हा जवळजवळ संपूर्ण देशात पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. भारताच्या जास्तीतजास्त शहरांमध्ये, रात्रीच्यावेळी पावसाच्या जोडीला बेडकाची डरावडराव ऐकू येईनाशी झाली आहे.
फोटो – निर्मल कुलकर्णी
Malabar Gliding Frog (Rhacophorus malabaricus)
झाडाच्या शेंड्यावरून उडी मारतांना आपल्या बोटांना जोडणाऱ्या पातळ कातडीमुळे तो स्वतःला पडण्यापासून वाचवतो. या क्षमतेमुळे याला “ग्लायडिंग” फ्रॉग हे नाव मिळाले आहे. हा ९ ते १२ मीटर लांब उडी मारू शकतो. या प्रजातीचे नर बेडूक हे मादी बेडकापेक्षा लहान असतात.
“आर्थिक विकासाच्या मागे लागलेले असतांना, आपण इतर सजीव प्राण्यांपासून दुरावले जात आहोत. बेडकासारखे लहान प्राणी तर आपल्या खिजगणतीतही नसतात. आपण कीटक मारण्यासाठी कीटनाशकांचा वापर करतो, कीटक नियंत्रण आणि निसर्गाचे नाजूक संतुलन राखण्यात बेडकाचे असलेले महत्त्व आपल्या लक्षातच येत नाही.” हे म्हणणे आहे बेट्राकोलॉजिस्ट के.एस.सेषाद्री यांचे. बेट्राकोलॉजी ही उभयचर प्राण्यांचा अभ्यास करणारी विज्ञानाची एक शाखा आहे.
दुर्मिळ होत चाललेल्या चिमण्यांविषयी लोकांमध्ये होते तशी बेडकांविषयी चर्चा अद्याप होतांना दिसत नाही. कधीकाळी पावसाळ्यात अगदी सहज नजरेस पडणाऱ्या कॉमन फ्रॉग, स्कीटरिंग फ्रॉग, क्रिकेट फ्रॉग, बुल फ्रॉग आणि नेरो- माउथिड फ्रॉग या सगळ्या प्रजाती शहरांमधून हळूहळू दिसेनाश्या झाल्या आहेत.
३५ कोटी वर्षांपासून बेडकांचे अस्तित्त्व या भूतलावर आहे आणि ते कितीतरी जैव परिसंस्थांचे अविभाज्य घटक आहेत.
फोटो – आनंदा बेनर्जी
Bi-colored frog (Clinotarsus curtipes)
 भारतातील पश्चिम घाटात ही प्रजाती आढळून येते. लहान असतांना यांचा रंग काळा असतो आणि जंगलातील संथ वाहणाऱ्या प्रवाहांमध्ये ते थव्याने राहतात.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे फ्रॉग स्पेशालिस्ट असलेले के.व्ही.गुरुराजा म्हणतात, “वातावरणातील सूक्ष्मातिसूक्ष्म बदलांप्रतीही संवेदनशील असल्यामुळे उभयचरांची गणना सर्वोत्कृष्ट जैव शास्त्रीय सूचकांमध्ये केली जाते म्हणूनच पर्यावरण संरक्षण आणि व्यवस्थापन कार्यात सरोगेट (surrogate) म्हणून त्यांचा (या कार्यात असलेल्या त्यांच्या विशेष भूमेकेचा) उपयोग  करता येऊ शकतो.”
फ्रॉग्स एन्ड टोड्स ऑफ वेस्टर्न घाट (पश्चिम घाटातील फ्रॉग्स आणि टोड्स) हे पुस्तक लिहिल्यानंतर याच प्रयत्नाचा पुढचा भाग म्हणून त्यांनी नुकतेच फ्रॉग फाईंड नावाचे अॅन्ड्रॉइड एप्लिकेशन सुरु केले आहे.
सेषाद्री म्हणतात, “पावसाशी बेडकांचा फार पूर्वीपासून घनिष्ट संबंध आहे, ते निसर्गाचे चांगले सूचक मानले जातात. आर्द्रता आणि तापमानातील बदलांना ते प्रतिसाद देतात. बेडकांसाठी अधिवासातील बदल विनाशकारक ठरले आहेत, ते या शहरी इमारतींच्या जंगलात आपले भरणपोषण करण्यास अगदी असमर्थ ठरले आहेत.”
उभयचरांच्या संख्येत धोकादायकरित्या होत असलेली घट ही एक जागतिक घटना आहे, वैज्ञानिकांसाठी ती एक चिंतेचा विषय बनली आहे. उभयचर हे किटकांवर जगतात; यात डासांचाही समावेश आहे; याउलट ते पक्षी आणि साप यांचे खाद्य आहेत, ते अन्नसाखळीच्या मध्यभागी आहेत आणि यामुळेच पर्यावरणीय आरोग्याचे ते महत्त्वाचे द्योतक आहेत.
त्यांच्या विशिष्ट जीवनचक्रासाठी आवश्यक असलेल्या पाणी आणि जमिनीवरील वातावरणात होणाऱ्या अत्यंत सूक्ष्म बदलांशीही त्यांची पातळ, ज्यातून पाणीही झिरपू शकते अशी त्वचा जुळवून घेऊ शकत नाही. अशाप्रकारे वातावरणात होणाऱ्या बदलांबद्दल ते ताबडतोब धोक्याची सूचना देतात, ते जैव-सूचक म्हणून काम करतात – ज्याप्रमाणे विसाव्या शतकात कोळश्याच्या खाणीत कॅनरी नावाचे छोटे पिवळे पक्षी धोक्याची सूचना देण्याचे काम करत असे.
International Union for Conservation of Nature (IUCN) च्या धोक्यात असलेल्या प्रजातींच्या रेड लिस्टनुसार, उभयचरांच्या १,८५६ प्रजातीं या लोप पावण्याच्या मार्गावर आहेत (ही संख्या म्हणजे उभयचरांच्या माहित असलेल्या प्रजातींच्या ३२% एवढी आहे.) याशिवाय, संपूर्ण जगात ४२७ प्रजाती अत्यंत धोकादायक, ७६१ धोकादायक आणि ६६८ असुरक्षित स्थितीत आहेत. उभयचरांच्या ५० प्रजाती या केवळ गेल्या १५ वर्षांतच नष्ट झाल्या असल्याची भीती वैज्ञानिकांना आहे. यातील १८ पेक्षा जास्त प्रजाती दक्षिण एशियातील आहेत.  
सभोवती अशी प्रतिकूल परिस्थिती असतांना भारतात २००० सालापासून आतापर्यंत उभयचरांच्या ११४ नवीन प्रजातींच्या शोध लागला आहे. भारतात आढळून येणाऱ्या उभयचर प्रजातींची संख्या २००६ मधील २८१ वरून ३४२ वर (एप्रिलपर्यंत) पोहोचली आहे.

फोटो - के.एस.सेषाद्री
Red Narrow-mouthed frog (Microhyla rubra)
या प्रजातीच्या लहान बेडकांचे आवडते निवासस्थान म्हणजे कमीतकमी परभक्षी (predator)असलेले पाण्याचे लहान डबके. हे पाण्याच्या पृष्ठभागाजवळ राहतात आणि पाण्यात तरंगणारे सूक्ष्म जीवाणू आणि अन्न कणांवर जगतात.
हे सर्व शोध एकतर पश्चिम घाटात लागले आहेत नाहीतर ईशान्य भारताच्या प्राचीन जंगलात लागले आहेत. ही दोन्ही ठिकाणे जैवविविधतेने संपन्न असलेल्या (Ecological hotspots) जगातील मोजक्या  ठिकाणांपैकी मानली जातात. परंतु आता ती विकासाच्या नावाखाली येणाऱ्या विनाशाच्या झळांना तोंड देत आहेत.
Conservation Assessment and Management Plan (CAMP) अंतर्गत भारतातील उभयचरांच्या जनगणनेसंबंधी करण्यात आलेल्या एका मूल्यांकनानुसार ३२ प्रजाती या अत्यंत धोकादायक, ७१ धोकादायक, ५२ असुरक्षित, आणि ९ धोक्याच्या जवळ अशा स्थितीत आहेत. इतर ६३ प्रजातींबद्दल कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याचे येथे म्हटले आहे. ५० पेक्षा जास्त प्रजाती नष्ट झाल्याचे मानले जाते.
वर उल्लेखिलेल्या शेवटच्या गटाचा शोध घेणे हे मुख्य लक्ष्य आहे दिल्ली विद्यापीठाच्या एका कार्यक्रमाचे, ज्याचे नाव आहे – Lost! Amphibians of India (भारताचे हरवलेले उभयचर!)  या अभियानात २५० सदस्य सहभागी असून त्या अंतर्गत देशातील विविध भागात ३० मोहिमा राबविल्या गेल्या आहेत.
ज्यांनी नवीन प्रजातींचा शोध लावला ते सगळेच फ्रॉग स्पेशालिस्ट नाहीत. अनिल झचारिया, ज्यांनी पश्चिम घाटात फ्रॉगच्या दोन मूळप्रजाती शोधल्या आहेत ते व्हेटर्नरी सर्जन आहेत. एक अभियंता असलेल्या संजय सोंधी यांनी अरुणाचल प्रदेशातील ईगलनेस्ट वन्यजीव अभयारण्यात बोम्पू लिटर फ्रॉगचा शोध लावला.
या शोधांनी (आणि पुनर्शोधांनी) बेट्राकोलॉजीच्या अभ्यासाला चालना दिली आहे याचवेळी वैज्ञानिकही म्हणत आहेत कि विकासाच्या रहाटगाड्याखाली भरडून नष्ट होण्यापूर्वीच नवीन पेशींची विज्ञानाला ओळख करून देणे खूप गरजेचे आहे. हे काम म्हणजे काळाशी स्पर्धा करण्यासारखे आहे.
बेट्राकोलॉजिस्ट के.एस.सेषाद्री म्हणतात “उभयचरांची जैवविविधता आणि परिसंस्था यांना पूर्णपणे समजून घेण्यासाठी आपल्याला अजून बरेच प्रयत्न करावे लागतील”
फोटो – के.एस.सेषाद्री Cricket Frog ( Fejervarya sp) (1)
  यांची खासियत म्हणजे हे गोड्या, क्षारयुक्त आणि अगदी समुद्री पाण्यातही राहू शकतात.
सेषाद्री, यांनी दक्षिण पश्चिम घाटातील अगस्त्यमलाई टेकड्यांमध्ये श्रब फ्रॉगची मूळप्रजाती Raorchestes ची नवीन प्रजाती शोधली, ते पुढे म्हणतात, “दर दुसऱ्या वर्षी नवीन प्रजातींची ओळख होत आहे. त्यांच्या परिसंस्था आणि त्यांचा नैसर्गिक इतिहास यांबद्दल आपल्याला खूपच कमी माहिती आहे. जैव विविधता संरक्षणासाठी या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. जर आपल्याला उभयचरांचे संरक्षण आणि संवर्धन करावयाचे असेल तर त्यांचा नैसर्गिक इतिहास, परिसंस्था आणि त्यांची वर्तणूक यांची इत्थंभूत माहिती नोंदवून ठेवण्यावर भर देणे अत्यंत आवश्यक आहे.”
भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी ६% क्षेत्रफळ व्यापणारा पश्चिम घाट हा प्रदेश देशातील ३०% हून अधिक पृष्ठवंशीय प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातींचे निवासस्थान आहे. या प्रदेशात फुलझाडांच्या ४,००० पेक्षा जास्त प्रजाती आहेत (३८% प्रदेशनिष्ठ), फुलपाखरांच्या ३३०(११% प्रदेशनिष्ठ), माशांच्या २८९(४१% प्रदेशनिष्ठ), उभयचरांच्या १३५(७८% प्रदेशनिष्ठ), सरपटणाऱ्या प्राण्यांच्या १५७(६२% प्रदेशनिष्ठ), पक्ष्यांच्या ५०८(४% प्रदेशनिष्ठ) आणि सस्तन प्राण्यांच्या १३७(१२% प्रदेशनिष्ठ) प्रजाती आहेत.  
उच्च प्रतीची प्रदेशविशिष्टता असलेले उभयचर हे पश्चिम घाटातील सर्वांत लक्षणीय असे पृष्ठवंशीय आहेत आणि म्हणूनच त्यांना असलेला धोकाही सर्वाधीक आहे.
गुरुराजा म्हणाले, “जल आणि औष्णिक विद्युत प्रकल्प, मोठी धरणे, अनियोजित शेती, वारंवार एकच पिक घेण्याची पद्धत, बेकायदेशीर लाकूडतोड यांसारख्या विकास प्रकल्पांच्या नावाखाली मानवाने घडवून आणलेल्या बदलांमुळे पश्चिम घाटावर आज प्रचंड ताण पडत आहे. “
फोटो - के.एस.सेषाद्री
ही झाडावर राहणाऱ्या बेडकांची एक प्रजाती आहे. यांची लांबी साधारणपणे ७ ते ८ सेमी असते. त्यांच्या त्वचेतून ते म्युकस आणि लिपीड यांचा स्त्राव सोडतात जेणेकरून त्वचेचा ओलावा टिकून राहण्यास मदत होते. ज्यावेळी तापमान जास्त असते त्यावेळी त्यांची त्वचा स्त्रवते (जसा आपल्याला घाम येतो) त्यांना धाप लागते आणि त्वचा सौम्य रंगाची होते.
ते पुढे म्हणाले, यामुळेच कधीकाळी दाट असलेले येथील जंगल तुकड्यांमध्ये विभागले जाऊन विरळ झाले आहे. याचे परिणाम वन्यजीवांच्या निवासक्षेत्राचे आकुंचन, पाणलोट क्षेत्रात वाहून येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात आणि साठ्यात बदल, नदी-ओढे यांसारखे पाण्याचे प्रवाह आटत जाणे आणि  मानव-प्राणी संघर्ष अशा घटनांमधून दिसून येत आहेत.
ईशान्य भारतातली परिस्थतीही यापेक्षा काही वेगळी नाही. तेथे उभारण्यात आलेल्या अनेक जलविद्युत प्रकल्पांनी त्या प्रदेशातील नाजूक परीसंस्थेला मोठा धोका निर्माण केला आहे. अधिवास विनाश हेच भारतातील उभयचरांच्या संख्येत धोकादायक प्रमाणात होत असलेल्या ऱ्हासाचे प्रमुख कारण असल्याचे आता म्हटले जात आहे.
WWF India च्या एका अहवालानुसार मागील १० वर्षांत पूर्व हिमालयात १६ नवीन उभयचरांचा शोध लागला आहे.
हा अहवाल म्हणतो, एक सेसिलीअन, एक टोड आणि १४ वेगवेगळ्या प्रकारच्या बेडकांचा शोध गेल्या दशकात प्रथमच लागला.”
१९९८ ते २००८ दरम्यान पूर्व हिमालयात कमीत कमी ३५३ नवीन प्रजातींचा शोध लावला गेला आहे. याचा अर्थ दरवर्षी ३५ नवीन प्रजाती! यात २४२ वनस्पती, १६ उभयचर, १६ सरपटणारे प्राणी, २ पक्षी आणि २ सस्तन प्राणी आणि कमीत कमी ६१ नवीन अपृष्ठवंशीय प्राण्यांचा समावेश आहे.
१९९४ सालच्या आपल्या “ट्रेकिंग द व्हेनिशिंग फ्रॉग: अॅन इकोलॉजीकाल मिस्ट्री” या पुस्तकात जर्नलीस्ट केथरीन फिलिप्स यांनी उभयचरांच्या नाशाची अनेक कारणे सांगितली आहेत. जसे – आम्ल पाऊस (Acid rain), हवा आणि पाणी प्रदूषण, ओझोनचा पातळ होणारा थर, अतिनील किरणोत्सर्ग (अल्ट्राव्हायोलेट रेडीएशन), दुष्काळ, अतिगुरचराई आणि जंगलतोड, रस्ता सोडून धावणारी वाहने, धरणे आणि मुळच्या नसलेल्या माशांचे आगमन.
या पुस्तकात फिलिप्स म्हणतात, गरुड किंवा मोठे मांसभक्षक प्राणी यांच्यासारखे प्रसिद्धीचे वलय न लाभल्यामुळे यांच्याकडे (उभयचर) लोकांचे लक्षच जात नाही.
याचाच प्रतिध्वनी टीव्ही होस्ट असलेल्या जेफ कोर्विन यांच्या २००८ सालच्या “द व्हेनिशिंग फ्रॉग” या माहितीपटात उमटतो.
फोटो – के.एस.सेषाद्री
Common Skitter Frog (Euphlyctis cyanophlyctis) (1) 
हे आकाराने लहान असतात. प्रवाहाच्या कडेला दिसून येतात. फक्त आपले डोळे पाण्याच्यावर ठेवतात. त्यांना डिवचले असता ते मोठा आवाज करत किनाऱ्यापासून दूर जातात यावरूनच त्यांचे नाव “skitter frog” असे पडले आहे. पाण्याबाहेर ते क्वचितच दिसतात.
यात ते म्हणाले, “बेडकाचा चित्तवेधकपणा लोकांच्या नजरेत भरणे खरच अवघड होते. सध्या उभयचरांच्या ६००० प्रजाती आहेत आणि पुढील काही वर्षांतच त्यातील ३००० आपण गमावून बसू.”
खाद्यासाठी होणारी बेडकांची बेकायदेशीर तस्करी हा सुद्धा या प्राण्याच्या अस्तित्वाला असणारा एक गंभीर धोका आहे. या व्यापारावर १९८५ सालीच बंदी घालण्यात आली होती परंतु आजही आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी बेडकांच्या पायांची मागणी पुरविण्यासाठी बेकायदेशीर मार्गांनी त्यांना जंगलातून पकडून नेले जाते. भारतात या बेकायदेशीर व्यापारात ग्रीन पाँड फ्रॉग आणि इंडियन बुलफ्रॉग यांची तस्करी प्रामुख्याने केली जाते.
वातावरणातील बदलाने उभयचरांच्या अस्तित्वाला अत्यंत गंभीर धोका निर्माण केला आहे. जोराचा पाऊस आणि नंतर दीर्घकाळ दुष्काळ अशा दुष्टचक्राबद्दलच्या भविष्यवाणी ऐकल्यावर वाटते कि आता उभयचरांचे दुर्भाग्य जवळपास निश्चितच आहे. निसर्गाने निर्माण केलेला डासांचा काळ आज स्वतःच्याच काळाशी एक न जिंकता येणारी लढाई लढतो आहे.

First Published in Live mint: http://www.livemint.com/Politics/HgVXtBco9WraoSOhXG64cM/Frogs-disappear-from-urban-landscape.html

suryavanshipd@gmail.com

@@@@

जागतिक पर्यावरणविषयक अवैध व्यापार २१३ अब्ज डॉलर्सपर्यंत: युएन अहवाल

आनंद बॅनर्जी, अनुवाद-परीक्षित सूर्यवंशी   
पर्यावरणविषयक अपराधांवरील एका मुल्यांकन अहवालानुसार जागतिक पर्यावरणविषयक अवैध व्यापार २१३ अब्ज डॉलर पर्यंत पोहोचला आहे.
भारतात वन्यजीव व्यापारात झालेल्या प्रचंड वाढीकडे मात्र या अहवालाचे दुर्लक्ष झाले आहे - फोटो - AFP
हे पैसे गुन्हेगार, उग्रवादी, आतंकवादी गटांना मदत म्हणून पुरविले जातात आणि अनेक देशांच्या सुरक्षिततेला आणि शाश्वत विकासाला धोका निर्माण करतात. द एन्व्हायर्नमेंट क्राईम क्रायसिस नावाचा हा अहवाल युनायटेड नेशन एन्व्हायर्नमेंट असेम्ब्लीच्या पहिल्या सभेत मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला.  
हा अहवाल आफ्रिकेतील वन्यजीव आणि वनस्पतींच्या संघटीत गुन्हेगार टोळ्यांकडून होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील कत्तलीकडे आणि त्यानंतर चीन आणि इतर दक्षिण पूर्व एशियायी देशांशी होणाऱ्या त्यांच्या व्यापाराकडे लक्ष वेधतो. या देशांत या परकीय वनस्पती आणि प्राण्यांची मुख्य बाजारपेठ आहे. पूर्व आफ्रिकेत कार्यरत अशीच एक दहशतवादी संघटना चारकोलच्या अवैध व्यापारातून दरवर्षी ३८ ते ५६ दशलक्ष डॉलर्स कमवत असल्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.  
याच अहवालात पुढे आफ्रिकेतील एकूण ४,२०,००० ते ६,५०,००० हत्तींपैकी दर वर्षी २०,००० ते २५,००० हत्ती मारले जात आहेत असे म्हटले आहे. ९४% गेंड्यांची अवैध शिकार झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेत होते, जेथे त्यांची शेवटची सर्वांत मोठी लोकसंख्या शिल्लक आहे. गेल्या वर्षी अवैधरीत्या शिकार केल्या गेलेल्या गेंड्यांच्या शिंगांची किंमत ६३ ते १९२ दशलक्ष डॉलर्स इतकी ठरविली गेली.
मात्र हा अहवाल भारतात २००९ पासून अवैध वन्यजीव व्यापारात झालेल्या प्रचंड वाढीकडे दुर्लक्ष करतो. TRAFFIC-WWF India, द वाईल्डलाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडीया (WPS) आणि वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो(WCCB) यांनी ही वाढ दस्तऐवजांद्वारे दाखवून दिली आहे.
९ जून रोजी झालेल्या एका बैठकीत धोरणकर्ते, वैज्ञानिक, संशोधक, संरक्षणवादी, कार्यकर्ते आणि वन विभाग तसेच पर्यावरण आणि वन मंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पेंगोलीन(खवले मांजर), पक्षी, कासव, शार्क्स यांच्यासारख्या काही कमी माहित असलेल्या प्रजातींच्या, ज्यांच्या अवैध व्यापाराबद्दल भारतात कमी माहिती आहे, संरक्षणासाठीच्या उपाययोजनांची चर्चा केली. भारतात दरवर्षी अवैधरीत्या हजारो खवले मांजर, सरडे आणि कासवे मारली जातात, अंदाजे ७,००,००० पक्षी बेकायदेशीररीत्या जाळ्यात अडकवले जातात आणि ७०,००० टन शार्क्स पकडले जातात.
भारतात TRAFFIC चे प्रमुख असलेले शेखर कुमार नीरज म्हणतात, “एकीकडे जेथे अवैध वन्यजीव व्यापाराकडून भारतातील काही प्रतिष्ठित प्रजाती जसे वाघ, गेंडा यांना असलेल्या धोक्याला खूप प्रसिद्धी दिली जाते तेथे दुसरीकडे भारताच्या बऱ्याच कमी माहित असलेल्या प्रजातीही अवैध शिकारीला बळी पडून वेगाने नामशेष होत असतांना त्यांच्या नशिबी मात्र अनुल्लेखच येतो आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अवैध व्यापाराचा भाग असल्यामुळे खवले मांजर अत्यंत संकटग्रस्त प्रजाती आहे तरीही त्यांची दुर्दशा संरक्षण आणि माध्यम वर्तुळात क्वचितच प्रसिद्ध पावते. इतर प्रजाती जसे मोनिटर लिझार्ड, मुंगूस, स्टार कासव, स्पाईनि-टेल्ड लिझार्ड, गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील कासवे यांच्याकडेही ताबडतोब लक्ष देण्याची गरज आहे.”
WWF-India चे सरचिटणीस रवी सिंग म्हणतात, “आम्ही लहान असतांना पाहत असलेल्या काही प्रजाती जसे बेंगाल मोनिटर आणि खवले मांजर या त्यांच्या बऱ्याचशा मूळ क्षेत्रातून नामशेष झाल्या आहेत.”  
सी कुकुम्बर, सीहोर्सेस आणि रेड सेंड बोआ यांच्या अवैध व्यापाराच्या प्रमाणाबद्दल आणि त्याचा त्यांच्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल खूपच कमी माहिती आहे.
हा अहवाल भारतात अवैध वन्यजीव व्यापारात दहशतवादी संघटना अल-कैदाचा सहभाग असल्याचे नोंदवतो. “वन्यजीव शोषण अनेक गैर सरकारी सशस्त्र गटांना मदत करते, अल-कैदाशी संबंधित स्थानिक बांग्लादेशी फुटीरतावादी; आणि भारतातील इतर उग्रवादी जमाती अवैध वन्यजीव व्यापारात गुंतलेले असल्याची नोंद आहे(हस्तिदंत,व्याघ्र अंगे, गेंड्यांची शिंगे). अल-कैदा आणि हक्कानी गट अवैध लाकूडतोड आणि त्याच्या व्यापारातून निधी उभारण्याचे आरोपी आहेत.”
या अहवालानुसार, फुटीरतावादी जमाती, बंडखोर आणि मुस्लीम अतिरेकी संघटना यांसह अनेक सशस्त्र संघटने काझीरंगा आणि त्याच्या आसपासच्या भागात अवैध शिकार करतात. या भागात जवळजवळ दोन डझन अतिरेकी संघटने सक्रीय आहेत.
यांपैकी अनेक संघटना आपला निर्वाह निधी उभारण्यासाठी उद्यानाच्या आत वाघ, हत्ती आणि गेंड्यांची अवैध शिकार करतात. असे मानले जाते कि या संघटना नेपाळ, थायलंड आणि चीन मधील गुन्हेगारी गटांशी जोडलेल्या आहेत.
द कार्बी पीपल्स लिबरेशन टाईगर्स (KPLT) अवैध शिकारीला प्रोत्साहन देते आणि तिचे आयोजन करते, यावेळी शिकाऱ्यांना शिंगांसाठी गेंड्यांना मारण्यासाठी आणि फोरेस्ट गार्डशी लढण्यासाठी एके47 दिल्या जातात.
कुकी नेशनल लिबरेशन फ्रंटच्या एका सदस्याला अटक झाल्यानंतर त्याने सहा गेंड्यांना मारल्याची कबुली दिली. २०१३ मध्ये काझीरंगामध्ये कमीतकमी ४१ गेंडे अवैध शिकारीत मारले गेले, त्याच्या आधीच्या वर्षी याच्या दुप्पट गेंडे मारले गेले. यातील जास्तीतजास्त अतिरेकी गटांद्वारे वापरल्या जाणाऱ्या एके-47 आणि .303 रायफल्सद्वारे मारले गेले.
first published:
suryavanshipd@gmail.com

@@@@@@

कारण अंदमानचे जंगल हे जारावांनी बुजबुजलेले आहे...

पंकज सेक्सारिया, अनुवाद-परीक्षित सूर्यवंशी
सामाजिक सुधारणांकडे जाणारा मार्ग हा वाईट हेतूंनी आच्छादलेला आहे.
जारावा महिलेला एक बस ड्रायव्हर काहीतरी खाण्याची वस्तू देत असतांना- फोटो -पंकज सेक्सारिया
Infestation – n. (इन्फे’स्टेशन्) – बुजबुजलेले असणे. कीटक किंवा परोपजीवांद्वारे अतिक्रमित किंवा व्यापलेले असण्याची स्थिती. जे लोक हजारो वर्षांपासून ज्या जमिनीवर व जंगलात राहत आलेले आहेत ते तेथे राहतात कि ती जमीन आणि जंगल बुजबुजवतात? या अगदी साध्या प्रश्नाचे उत्तर आज अंदमान बेटांवरील जारावांना तोंड द्यावे लागत असलेल्या समस्येच्या मुळाशी आहे. अंदमान ट्रंक रोडवर जारावा स्त्रियांना केवळ अन्नासाठी नाचतांना दाखवणारा व्हिडीओ हा ज्या अस्वस्थतेचे आधुनिक प्रकटीकरण आहे ती इतकी खोलवर रुजलेली आहे कि कोणीही खात्रीने म्हणेल कि जारावांसाठी आशेचा एकही किरण आता शिल्लक राहिलेला नाही.
१९६५ मध्ये भारत सरकारच्या पुनर्वसन मंत्रालयाने अंदमान निकोबार बेटांशी संबधित एक महत्त्वाचा दस्तऐवज प्रकाशित केला. ‘अंदमान निकोबार बेटांच्या द्रुतगती विकासाच्या कार्यक्रमावर इंटर डिपार्टमेंटल टीमचा अहवाल’ (The report by Inter Departmental Team on Accelerated Development Programme for Andaman and Nicobar Islands). या अहवालात समाविष्ट गोष्टी आणि त्यांचा उद्देश त्याच्या शीर्षकावरूनच स्पष्ट होतात. या अहवालाने या बेटांच्या विकासाचा आराखडा तयार केला आणि पुढच्या दशकांमध्ये जे घडणार होते त्यासाठीची पृष्ठभूमी तयार केली आणि ते तसे घडलेही. हा खूप कमी माहित असलेला आणि शंभरहूनही कमी पानांचा अहवाल त्या काळातील विचारसरणी कशी होती हे दर्शवितो. अगदी धक्कादायक अशा काही गोष्टी या अहवालाच्या प्रत्येक पानावर आहेत. खालील काही प्रातिनिधिक उदाहरणे पहा:
पान नं. २६: ........बाहेरच्या सर्व लोकांना जारावा हे एकसारखे विरोध करत आलेले आहेत. याचा परिणाम मध्य अंदमानातील जवळजवळ अर्धा भाग जारावांनी बुजबुजलेला(भर देऊन) मनाला जातो. ज्यात बाहेरची कोणतीही व्यक्ती प्रवेश करण्याचे धाडस करणे अवघड आहे.......सध्या सुरु असलेले रस्त्याचे बांधकाम आणि जंगलाच्या सीमांचे वसाहतीकरण यांमुळे संघर्षात वाढ झालेली आहे आणि जारावांकडून हल्ला होत नाही असा एकही महिना जात नाही.
पान नं. ६९: महान अंदमान ट्रंक रोडच्या पूर्ण होण्याने जंगलातील साधनसामग्री मिळविण्यास खूप मोठी मदत होईल.....
जे राष्ट्र नुकतेच एक वसाहत असल्याच्या नामुष्कीतून बाहेर पडले आहे तेच राष्ट्र आज स्वतःच एक वसाहतकार बनू पाहत आहे. त्याच्या आड जे कोणी येतात ते मग फक्त कीटक किंवा परोपजीवी असू शकतात जे अत्यंत मौल्यवान साधनसामुग्री असलेल्या जंगलात बुजबुजतात आणि ती साधनसामुग्री उत्पादनक्षम वापरापासून दूर जंगलात अडकून राहते.
येथे एक गोष्ट नमूद करणे प्रसंगोचित ठरेल, १९५७ मध्येच, १९५६च्या Andaman and Nicobar Protection of Aboriginal Tribes Regulation (ANPATR) या कायद्याच्या तरतुदींनुसार याच “जारावांनी बुजबुजलेल्या” दक्षिण आणि मध्य अंदमानातील १००० चौ.किमी पेक्षा जास्तीचा जंगलाचा भाग हा “जारावा जमातीसाठी राखीव” म्हणून संरक्षित घोषित करण्यात आला होता.
१९६५ चा हा अहवाल म्हणजे जारावांच्या आणि ते हजारो वर्षांपासून राहत असलेल्या जंगलाच्या या कायदेशीर संरक्षणाचे पूर्ण उल्लंघन आहे अथवा त्याबद्दल पूर्ण अज्ञान असल्याचा परिणाम आहे.
त्यावेळी जी बीजे रोवली गेली ती आज अगणित विषारी झुडुपांच्या रूपाने उगवली आहेत आणि ज्याला हा इतिहास माहित असेल त्याला आता ज्या व्हिडीओने इतकी खळबळ माजवून दिली त्याचे अजिबात आश्चर्य वाटणार नाही.
गेल्या काही दिवसांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांचा बराचसा भाग हा या व्हिडीओची तारीख, त्याच्या निर्मितीत पोलिसांचा सहभाग, टूर ऑपरेटर्सची भूमिका आणि आरोप व जबाबदारी निश्चित करण्याबाबतच्या दाव्यांनी आणि प्रतीदाव्यांनी व्यापून राहिलेला आहे. या सगळ्यात अत्यंत कमी माहित असलेली गोष्ट, जी या सगळ्यांचे मुळ आहे ती तर विस्मरणातच गेली आहे – ती म्हणजे अंदमान ट्रंक रोडचे अस्तित्त्व, जेथे हा कुप्रसिद्ध व्हिडीओ तीन वर्षांपूर्वी काढला गेला. १९६५ च्या अहवालाने जारावांच्या जंगलातील साधनसामुग्री उपसून काढण्याचा एक चांगला मार्ग म्हणून देऊ केलेला हा अंदमान ट्रंक रोड सर्वोच्च न्यायालयाने २००२ मध्ये एका आदेशाद्वारे बंद करण्यास सांगितले आहे.
याला आता एका दशकाहुनही अधिक काळ लोटला आहे आणि ज्याला फक्त उद्धट अवज्ञा म्हणता येईल अशाप्रकारे या लहानश्या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाने देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. कित्येक प्रशासक आले आणि गेले परंतु न्यायालयाचा अवमान तसाच सुरु आहे.
जेव्हा जेव्हा या आदेशाबद्दल विचारले गेले तेव्हा येथील प्रशासनाने आदेशाच्या तांत्रिक शब्दांच्या पाठीमागे लपण्याचा प्रयत्न केला. त्यांचे म्हणणे कि सर्व प्रथम न्यायालयाने हा रोड बंद करण्याचा आदेशच कधी दिलेला नाही. ते हे विसरतात कि मार्च २००३ मध्ये म्हणजेच न्यायालयाने आदेश दिल्यानंतर काही महिन्यातच त्यांनी स्वतः “अंदमान ट्रंक रोडचा वापर/त्यावरून हालचाल करण्याची परवानगी मिळावी” अशी याचना करणारे शपथपत्र दाखल केले होते. जर हा रस्ता बंद करण्याचे आदेशच दिले गेले नव्हते तर तो उघडण्याची याचना कशासाठी? काही महिन्यानंतर जुलै २००३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या केंद्रीय अधिकृत समितीने स्पष्टपणे पुनरुच्चार केला कि अंदमान ट्रंक रोडचा जो भाग जारावा जमातीसाठी संरक्षित जंगलातून जातो तो बंद करण्याच्या आदेशाचाही न्यायालयाच्या आदेशात समावेश आहे. अंदमान आणि निकोबारच्या प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाचे स्पष्टपणे उल्लंघन केले आहे. शब्दाने आणि कृतीनेही.
Anthropological Survey of India चे माजी संचालक आर.के.भट्टाचार्य यांचे शब्द याबाबतीत बरेच उद्बोधक आहेत. २००४ मध्ये कलकत्ता उच्च न्यायालयात त्यांनी एक अहवाल सादर केला ज्यात ते म्हणतात, “हा अंदमान ट्रंक रोड म्हणजे खाजगी अंगणातून जाणाऱ्या सार्वजनिक हमरस्त्यासारखा आहे.......संपूर्ण मानवी इतिहासात आपण पाहत आलो आहोत कि जे प्रबळ होते ते नेहमीच त्यांच्या फायद्यासाठी अल्पसंख्याकांना नमवीत आलेले आहेत. नैतिक तत्त्वांकडे त्यांनी कधी लक्ष दिलेच नाही. अंदमान ट्रंक रोड बंद करणे हे कदाचित प्रबळ गटाकडून कमजोर गटासाठी, जो विनाशाच्या अगदी कडेवर आहे, सदिच्छा व्यक्त करणारी पहिली कृती ठरेल.
आधीच्या सर्व संधींकडे अज्ञानामुळे, उद्धटपणामुळे किंवा केवळ औदासीन्यामुळे लक्ष दिले गेलेले नसतांना यावेळी हा व्हिडीओ त्याच्या संपूर्ण विकृतीसह आपल्याला आणखी एक संधी उपलब्ध करून देत आहे. सदिच्छा व्यक्त करणारी ती कृती करण्यास अजूनही खूप उशीर झालेला नाही. असे न केल्यास पुढील वर्षांमध्ये तसे अनेक व्हिडीओ येतील आणि त्याहूनही बरेच वाईट घडेल. या बाबतीत इतिहासातून मिळणारा बोध अगदी स्पष्ट आहे. मग आम्ही तुम्हाला हे सांगितलं होत अस म्हणणारी खूप कमी माणसे राहतील आणि ही गोष्ट कदाचितच आपले सात्वन करू शकेल.
(लेखक हे कल्पवृक्ष या संस्थेशी संबंधित आहेत. ही संस्था त्या तीन अशासकीय संस्थांपैकी एक आहे ज्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचा परिणाम म्हणून २००२ साली अंदमान ट्रंक रोड बंद करण्याचा आदेश देण्यात आला. Troubled Islands- Writings on the Indigenous peoples and environment of Andaman and Nicobar Islands या पुस्तकाचेही ते लेखक आहेत.)   
First published in The Hindu on 19 January 2012.

suryavanshipd@gmail.com
 @@@@@@@